टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतून घेणार माघार
मुंबई, 19 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव सुरु आहे. याचदरम्यान, बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आगामी आशिया चषकातून टीम इंडिया माघार घेणार असल्याचं समोर आलं आहे.येत्या जूनमध्ये होणार असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ भा
Aisa cup


मुंबई, 19 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव सुरु आहे. याचदरम्यान, बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे. आगामी आशिया चषकातून टीम इंडिया माघार घेणार असल्याचं समोर आलं आहे.येत्या जूनमध्ये होणार असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ भाग घेणार नाही, असा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे.याबाबत बीसीसीआयकडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या निर्णयानुसार, टीम इंडिया आगामी आशिया कपमध्ये सहभागी होणार नाही. पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग आशिया कपवरही बीसीसीआय बहिष्कार टाकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयने याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेला देखील या निर्णयाची माहितीही दिली आहे. आशियाई क्रिकेट परिषदचे अध्यक्ष सध्या पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी आहेत, जे पीसीबीचे अध्यक्ष देखील आहेत.यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का देण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हा निर्णय भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. ''भारतीय संघ एसीसीने आयोजित केलेल्या आणि पाकिस्तानी मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत खेळू शकत नाही. ही देशाची भावना आहे. आम्ही आगामी महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेतल्याबद्दल एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्पर्धांमधील आमचा सहभागही थांबवण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या सुत्राने म्हटले आहे.

बीसीसीआयच्या निर्णयामुळे सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येणारी आशिया चषक स्पर्धा धोक्यात आली आहे. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कपमध्ये खेळतात. महत्वाचे म्हणजे आशिया कप भारताने आयोजित केला होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकामुळे यंदाची ही स्पर्धा २०-२० स्वरुपात होणार होती. २०२३ नंतर ही स्पर्धा होत होती. या स्पर्धेचे बहुतांश प्रायोजक हे भारतीय आहेत. यामुळे ते देखील या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. असे झाले तर ही स्पर्धाच रद्द होऊ शकते

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande