मुंबई, 30 मे (हिं.स.) - एशियन अॅथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये बीडच्या अविनाश साबळेने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरत इतिहासाला गवसणी घातली. त्याने ३००० हजार मीटर स्टीपलचेस या प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. १९८९ नंतर म्हणजेच जवळापास ३६ वर्षानंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळण्यात यश आलं आहे. दक्षिण कोरियाच्या गुमीमध्ये सुरु असलेल्या एशियन अॅथेलटीक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ८.२०.९२ सेकंदांची वेळ नोंदवत त्यानं आपलं सुवर्णपदक निश्चित केलं. जपानच्या युटारो नीनायेला रौप्य तर कतारच्या झाकारियाने कांस्य पदकाची कमाई केली.
३० वर्षीय अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा भारताचा तिसरा अॅथलीट आहे. याआधी हर्बेल सिंग यांनी १९७५ तर दीना राम यांनी १९८९मध्ये या प्रकारामध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवलं होतं. तर २०१९ या वर्षीय दोहामध्ये अविनाश साबळेला रौप्य पदकावर समाधान मानाव लागलं होतं. अखेर त्याने सुवर्णपदक मिळवत आपल्या पदकाचा रंग बदलण्यात यश मिळवलं. डायमंड लीग आणि वर्ल्ड अॅथलेटीक्समध्ये आपली छाप सोडल्यानंतर आता साबळेने एशियन अथलेटीक्स स्पर्धेत साऱ्यांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. एशियन अथलेटीक्स स्पर्धेत आतापर्यंत भारतीय अॅथलीट्सनी १४ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी