न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षक डेविड ट्रिस्ट यांचे निधन; क्रिकेट विश्वात शोककळा
वेलिग्टन, ३० मे (हिं.स.) : न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डेविड ट्रिस्ट यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी क्राइस्टचर्च येथे अखेरचा श्वास घेतला. ट्रिस्ट हे न्यूझीलंडला पहिले मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विजेतेपद मिळवून देणारे प
डेविड ट्रिस्ट


वेलिग्टन, ३० मे (हिं.स.) : न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डेविड ट्रिस्ट यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी क्राइस्टचर्च येथे अखेरचा श्वास घेतला. ट्रिस्ट हे न्यूझीलंडला पहिले मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने २००० साली नैरोबी येथे झालेल्या ICC नॉकआउट (चॅम्पियन्स ट्रॉफी) स्पर्धेत भारताचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

एक काळचा वेगवान गोलंदाज असलेल्या ट्रिस्ट यांनी कॅंटरबरी संघासाठी १४ वर्षे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले आणि कॅंटरबरीसह दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग व नेदरलँड्स यांसारख्या संघांसोबत काम केलं. १९९९ मध्ये त्यांनी न्यूझीलंड राष्ट्रीय संघाची जबाबदारी स्वीकारली.

२००० मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात चार गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात क्रिस केर्न्स यांनी नाबाद शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्या विजयाबाबत ट्रिस्ट यांनी एकदा सांगितले होते की, तो क्षण खेळाडूंना मिळालेल्या आनंदासाठी आणि न्यूझीलंडसाठी एक विशेष कामगिरी होती.

राष्ट्रीय संघातून निवृत्तीनंतरही ट्रिस्ट यांनी क्रिकेटपासून फारकत घेतली नाही. त्यांनी क्राइस्टचर्चमधील ओल्ड कोलेजियन्स क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षक संचालक म्हणून काम केले आणि भारत व इंग्लंडमध्येही विविध प्रशिक्षकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्रिस्ट यांच्या योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या जाण्याने न्यूझीलंड क्रिकेटने एक अनुभवी मार्गदर्शक आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande