नाशिक, 30 मे (हिं.स.)। महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनआणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिकमध्ये २९ ते ३१ मे दरम्यान ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या तोलानी चषक राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्याकडून ब्रीज या खेळाला मान्यता असून त्यांच्याकडून ब्रीज खेळाच्या सर्व उपक्रमासाठी साईकडून सहकार्य मिळत आहे. तोलानी शिपिंग कंपनी यांनी पुरस्कृत केलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रीज फेडेरेशन यांच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार या स्पर्धेमध्ये १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे मुले आणि मुली या चार वयोगटाचा अंतर्भाव आहे.
यामध्ये टीम चॅम्पिअनशिप ( टीम ऑफ फोर), मॅच पॉईंट पेअर्स आणि आय. एम. पी. पेयर्स या तीन प्रकारच्या स्पर्धाचा अंतर्भाव आहे. काल पहिल्या दिवशी टीम चॅम्पिअनशिप प्रकारच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या. यामध्ये खेळणारे खेळाडू जागतिक स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू खेळात असल्यामुळे चांगलीच चुरस दिसून आली. यामध्ये १६ वर्षे गटामध्ये प्रखर बन्सल, विहा गहरोत्रा, जस्मिन नारंग आणि अनंता मेहता यांच्या संघाने सर्वात मोठी आघाडी मिळवत ७१. ३० गुण मिळवत या गटाचे विजेतेपद आपल्या नांवें केले. या गटात अग्लेन, अधिमान, राशी मोहका आणि साई कार्तिक यांच्या संघाने त्याखालोखाल ५२. ३७ गुण मिळवत दुसरे स्थान मिळविले. तर कृष्णनाथ, एस. रोशन, एल. सुंदरम आणि एस. अनंथा यांच्या संघाने ४५. १६ गुणांसह तिसरे स्थान मिळविले. २१ वर्षे गटामध्ये राशी जहागीरदार, नचिकेत, तीर्थराज चौधरी आणि माधव प्रकाश यांनी सुंदर खेळ करून ६५. ०९ गुणांसह पहील्या स्थानावर आपले नाव पक्के केले आहे. या गटात बी. विग्नेश, बी, भावनेश, भारत कोपुलालू आणि समीर शिंदे यांनी ५२. २५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. तर, विनीत नंदू, कुंज छेडा, जिया गुप्ता यांनी ३६. ५८ गुण मिळवत तिसरे स्थान मिळविले. ३१ वर्षे गटात शुभम आचार्य, कल्पना गुर्जर, प्रदीप डे, आणि स्वर्णशीश चॅटर्जी यांच्या संघाने प्रथम बोर्डपासूनच आपापसात चांगला समन्वय राखत ९५. २२ गुण मिळवत या गटाचे विजेतेपद मिळवत पहिल्या स्थानावर आपला हक्क प्रस्थापित केला. या गटात साई मंजू, दिनेश बाबू, सौविक साहा आणि मोनू बार यांच्या संघाने ७४. ९१ गुणांसह दुसरे तर अमित आकर्ष, तरुण, मुकुल कुमार, आणि विजय कुमार रंजन यांना केवळ ०९. ८७ गन मिळविता आल्यामुळे तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
टीम चॅम्पिअनशिप स्पर्धा संपल्यानंतर मॅच पॉईंट पेअर्स या प्रकाराला सुरवात करण्यात आली. या प्रकारात केवळ दोन खेळाडूंची जोडी असते. यामध्ये जी जोडी जास्त गुण मिळवेल त्या जोडीला विजेती जोडी असे घोषित केले जाते. याप्रमाणे आज १६ वर्षे गटामध्ये सहा राऊंड्स खेळविले गेले. यामध्ये प्रखर बन्सल आणि विहा गहरोत्रा या जोडीने ६४. ४८ गुण मिळवत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर चुरशीच्या या गटामध्ये अधियामन आणि अग्लेन या जोडीनंही सुंदर खेळ करत ६०. ७९ गुणांसह चांगली लढत दिली आहे. तर राशी मोहांका आणि साई कृतिक यांनीहो जोमाने खेळ करत ५८. १३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. २१ वर्षे गटामध्ये मॅच पॉईंट पेअर्स प्रकारात गई गुप्ता आणि निचिकेता या जोडीने चांगला समन्वय राखत ७०. ०९ गुणांसह या गटात आघाडी मिळविली आहे. तर बी. विग्नेश्वरण आणि बी. भावनेश्वरन या जोडीने ५८. ७८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर तीर्थराज आणि माधव प्रकाश यांनी चांगली लढत देत ५६. ०४ अश्या अवघ्या २. ७४ गुणांनी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यामध्ये पुढील राऊंडमध्ये नक्कीच बदल दिसून येईल.
या स्पर्धेवर केंद्र शासनाच्या साईचे उपसंचालक नितीन कुंडू, साईचे ब्रीज खेळाचे प्रमुख संतोष कुमार नजर ठेवून आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि ज्युनियर खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय ब्रीज फेडेरेशनचे उपाध्यक्ष तथा ज्युनियर खेळाडूंच्या डेव्हलपमेंट कमिटीचे सचिव आनंद सामंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल पाध्ये, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव तथा या स्पर्धेचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे , खजिनदार माधव होनप हे प्रयत्नशील आहेत.
स्पर्धेची तांत्रिक बाजू स्पर्धा संचाकल के. एस. स्वामिनाथन सांभाळत आहेत. उद्या उर्वरित मॅच पॉईंट पेअर्स स्पर्धा आणि आय. एम. पी. पेअर्स स्पर्धा खेळविल्या जातील.
भारतीय संघांची निवड - या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भारताच्या संघासाठी निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक ११ ते १७ जुलै, २०२५ दरम्यान इटली येथील सोल्सोमाज ओरे शहरात आयोजित जागितिक ब्रीज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन प्रमुख तथा महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव आणि स्पर्धा प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI