रत्नागिरी, 8 मे, (हिं. स.) : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ११ व १२ मे २०२५ रोजी दापोली समर सायक्लोथॉन सीझन ७ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दापोलीच्या सोहनी विद्यामंदिर मैदानात ही स्पर्धा होईल. यासाठी राज्यातील अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत. यामध्ये ७० वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकल चालवत येऊन साजरा करणाऱ्या पुणे येथील ७८ वर्षीय डॉ. निरूपमा भावे सहभागी होणार आहेत. त्यांनी ७२ व्या वर्षी पुणे ते जम्मू, ७५ व्या वर्षी पुणे ते कोलकाता, पंढरपूर ते घुमान (पंजाब) असे देशभर अनेक सायकल प्रवास केले आहेत. आदिकैलास, ओम पर्वत मार्गावर सायकलिंग, श्रीनगर ते मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग करत जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे सतीश जाधव (वय ६८), अनेक लांब अंतराच्या मॅरेथॉन, राइड करत असणारे ७७ वर्षीय जुगल राठी, नुकतीच दिल्ली- कोलकाता- पुणे राइड केलेले ७९ वर्षीय गौतम भिंगानिया, जगातील सर्वांत उंच उमलिंगला पास सायकल चालवत सर करणारे डॉ. सुभाष कोकणे (वय ७३), जयश्री जाधव (वय ६२), राजू औटी (वय ६१), विजय हिंगे (वय ६५), अरुण नेवसे (वय ६४), हेमलता राव (वय ६६) असे सायकलिंग क्रीडाप्रकारात वय हद्दपार करणारे काही रायडर्स दापोली सायक्लोथॉनमध्ये सहभागी होऊन सायकल चालवणार आहेत. देश-विदेशात सायकलिंग केलेल्या या सर्वांचे प्रेरणादायी अनुभव ऐकणे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे नक्कीच पर्वणी असणार आहे.
ही सायकल स्पर्धा १ ते १५० किमी अंतराची असून ५० किमी कोस्टल सिनिक रूट, ४ ते १५० किमी शॉर्ट सिटी लूप, फन राइड अशा गटांत होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ५०, ७५, १००, १२५, १५० किमी सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी २००, ३००, ४००, ५००, ६०० रोख रकमेचे बक्षीस असेल. शिवाय इतर काही खास बक्षिसेही दिली जातील. १२ तासांत १५० किमी अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. ५० किमी कोस्टल सिनिक रूट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर ते आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णै, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल.अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७ किंवा ९०२८७४१५९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी