कीव, 8 मे (हिं.स.)।पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील ९ ठिकाणाच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या पराक्रमानंतर देशवासीयांनी लष्कराला सलाम केला. यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. अमेरिका, इस्रायल, इंग्लंड यांसारख्या देशांनी भारताचे समर्थन केले आहे.यातच आता युक्रेनने भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचे आणि संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याबद्दल युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही दोन्ही पक्षांना संयम राखण्याचे आणि अर्थपूर्ण राजनैतिक संवाद साधण्याचे आवाहन करत आहोत. दक्षिण आशियात सुरक्षा परिस्थिती आणखी बिघडू शकेल अशा कृती टाळणे आणि त्याऐवजी सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढण्याला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. युक्रेन शांतता आणि स्थिरता पुनर्स्थापित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व उपाय योजना करण्याला आणि तणाव त्वरित कमी करण्यासाठी समर्थन देतो. युक्रेनचे परराष्ट्र मंत्रालय पुढील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय उपक्रमांना आणि प्रयत्नांना पाठिंबा देत राहील, असे युक्रेनने म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. यात सीमेवरील गावांतील चार मुलांसह १६ जण ठार आणि १५० जण जखमी झाले. भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी गोळीबारात सर्वाधिक नुकसान पूंछ जिल्ह्यात झाले आहे. भारतीय सैन्य गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर देत आहे. शत्रूच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्या बाजूने मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण व पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतला. भारताने केलेल्या हल्ल्यात आमच्या निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode