* सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई
अकोला, ९ मे (हिं.स.) : डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा (DHBBVC) २०२५ च्या अंतिम परीक्षेत अकोला येथील चार विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची घोषणा अभिमानपूर्वक केली आहे. या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावून आपली बुद्धिमत्ता, चिकाटी आणि मेहनतीचा ठसा उमटवला आहे. यशस्वी विद्यार्थी हे आकाश एज्युकेशनल संस्थेतील असून त्यांचा सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा १९८१ सालापासून ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, समस्या सोडवण्याची क्षमता आणि विज्ञानविषयक तर्कशक्ती विकसित करण्यासाठी ही स्पर्धा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते.
या चार विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये भव्य अग्रवाल याने ८४ गुण मिळवत सुवर्ण पदक व ३००० ची शिष्यवृत्ती मिळवली. आर्या राठी आणि शुभ पटेल यांनी अनुक्रमे ८६ व ८२ गुण मिळवून रौप्य पदके आणि प्रत्येकी २००० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली. विहान वोरा याला कांस्य पदक व १००० रुपये ची शिष्यवृत्ती देण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचे चारही कठीण टप्पे पार करून हे यश मिळवले आहे.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) चे मुख्य शैक्षणिक व व्यावसायिक प्रमुख (पश्चिम) डॉ. एच.आर. राव यांनी या विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतील हे यश आमच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विज्ञानाबद्दलची उत्कंठा आणि सखोल विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, समर्पण आणि आमच्या शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन आहे.”
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही ६वी व ९वीतील विद्यार्थ्यांसाठी असून ती इंग्रजी आणि मराठी माध्यमांतून घेतली जाते. ही स्पर्धा चार टप्प्यांत पार पडते – सिद्धांतिक परीक्षा, प्रायोगिक परीक्षा, सामान्य मुलाखत, आणि क्रियाशील संशोधन प्रकल्पाचे मूल्यांकन व मुलाखत. या स्पर्धेचा उद्देश विज्ञानाची समज, तर्कशक्ती, आकलन आणि शास्त्रीय तत्वांचा प्रत्यक्ष उपयोग यांना प्रोत्साहन देणे हा आहे. प्रश्न मुख्यतः महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित असतात, शिवाय आयसीएसइ, आय बी आणि सीबीएसइच्या शैक्षणिक साहित्याचा समावेश असतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी