वर्धा, 9 मे (हिं.स.)। समुद्रपुर तालुक्यात उत्पादीत होत असलेल्या वायगाव हळदीमध्ये विशेष गुणकारी तत्व आहे. त्यामुळे या हळदीला विशेष मागणी असते. भौगोलिक नामांकन प्राप्त या हळदीला लवकरच देश आणि जागतिक पातळीवर चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. या हळदीला ‘प्रमोट’ करण्यासाठी अपेडा, ईफिक्की सारख्या संस्थांची मदत घेऊ. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, मार्केटींगचे चांगले प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा, अपेडा, ईफिक्की, स्मार्ट प्रकल्प आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टच्या वतीने वायगाव हळदीची दुबई येथे निर्यात, विपणन व प्रसिध्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे, अपेडाचे विभागीय प्रमुख प्रशांत वाघमारे, ईफिक्कीचे अध्यक्ष युनिव्हर्सल एक्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण वानखडे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॅा.नलिनी भोयर, विदर्भ नैसर्गिक उत्पादक शेतकरी कंपनीच्या संचालक शोभाताई गायधने आदी उपस्थित होते.
वायगाव हळद दुबईला रवाना होत असतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटत आहे. वायगाव हळद उत्पादक संघाने या हळदीचे भौगोलिक नामांकन मिळविले. समुद्रपुर तालुक्यातील 400 शेतकरी 160 हेक्टरवर या हळदीचे उत्पादन घेते. या शेतकऱ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन या हळदीच्या उत्पादनाकडे अधिकाधिक शेतकरी कसे वळतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांची टीम आंतरराष्ट्रीय बाजार तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी दुबई येथे पाठवण्यात येतील, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.
वायगाव हळद जास्तीत जास्त निर्यात करण्यासोबतच विपणन साखळीतील मध्यस्थ कमी होणे देखील आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अधिक भाव मिळण्यासाठी थेट शेतकरी ते ग्राहक असा प्रयत्न करू, असे पालकमंत्री डॅा. भोयर म्हणाले.
एक जिल्हा एक उत्पादन या योजनेंतर्गत वायगाव हळदीला आपण जास्तीत जास्त ‘प्रमोट’ करतो आहे. अलिकडे बाजार तंत्र फार महत्वाचे आहे. त्यामुळे या हळद उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजिंग, मार्केटींग आणि अनुषंगीक बाबींचे चांगले प्रशिक्षण देण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम घेऊ. हळद उत्पादक शेतकरी कंपन्यांची अपेडाद्वारे नोंदणी, हळदीचे क्षेत्र व उत्पादकतेत वाढ आणि थेट शेतकरी कंपन्या हळदीची निर्यात करू शकेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.
यावेळी अपेडाचे विभागीय प्रमुख प्रशांत वाघमारे यांनी हळदीच्या निर्यातीसाठी शेतकरी कंपनीची अपेडा नोंदणी, ग्लोबल गॅप प्रमाणपत्र, ऑर्गेनिक प्रमाणपत्र, पॅक हाऊस, शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या गोष्टी महत्वाच्या आहे. मुंबईत होत असलेल्या प्रदर्शनांमध्ये वायगाव हळदीसाठी स्टॅाल उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले. युनिव्हर्सल एक्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण वानखडे यांनी हळदीच्या निर्यातीसाठी आपला पुढाकार राहिल. भविष्यात आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना येथे आणून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी बाजार तंत्र शिकले पाहिजे. असे सांगितले. प्रास्ताविकात आत्माच्या प्रकल्प संचालक डॅा.नलिनी भोयर यांनी भारत हा सर्वाधिक हळद निर्यात करणारा देश आहे. जिल्ह्यात 500 हेक्टरवर हळदीची लागवड होते. समुद्रपुर तालुक्यात 160 हेक्टरवर 400 शेतकरी वायगाव हळदीचे उत्पादन घेते. भौगोलिक नामांकन प्राप्त या हळदीच्या औषधी गुणकारी तत्वामुळे विशेष मागणी असते. जिल्ह्यातून प्रथमच ओल्या हळदीची निर्यात केली जात आहे. यासाठी अपेडा आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. सभागृहातील कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांच्यांहस्ते हिरवी झेंडी दाखवून दीड टन ओल्या हळदीची खेप नागपूरकडे रवाना करण्यात आली. तेथून हळद विमानाने दुबईला जाणार आहे.
शेतकऱ्यांचा सत्कार व धनादेश वितरण
समुद्रपुर तालुक्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून दुबईसाठी हळद घेण्यात आली. त्यानिमित्त वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनीचे पंकज भगत, कृषोन्नती शेती उत्पादक कंपनीचे पितांबर भुमरे तर विदर्भ नैसर्गिक शेती शेतकरी कंपनीच्या शोभाताई गायधने यांना प्रत्येकी 75 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हळद निर्यातीसाठी योगदानाबद्दल आकाश डंभारे यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने