नांदेड, 9 मे (हिं.स.)।
मागील 40 वर्षापासुन रखडलेल्या लेंडी प्रकल्पाची अखेर गळभरणी कामाला सुरुवात करण्यात आली. या लेंडी प्रकल्पात 12 गावे समाविष्ट असुन पहिल्या टप्प्यात रावणगाव, भाटापुर, हसनाळ, मारजवाडी, भिंगोली व भेंडेगाव खु. असुन दुसऱ्या टप्यात वळंकी, कोळनुर, भेंडेगाव बु, ईटग्याळ व मुक्रमाबाद ही गावे येतात.
मागील दोन महिण्यापासुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसिलदार राजेश जाधव, कार्यकारी अभियंता तिडके यांनी लेंडी प्रकल्पग्रस्तासंबंधी प्रशासन स्तरावर व गावागावात जाऊन लेंडी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही अर्ज निकाली सुध्दा काढण्यात आले. तसेच आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सरकार स्तरावर वेळोवळी पाठपुरावा करुन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाने अखेर गळभरणीला सुरुवात केली. या गळभरणीला पुनर्वसनातील गावांचा विरोध न होता सर्वांच्या सहकार्याने लेंडी धरणाची गळभरणी केली हे विशेष. तसेच गळभरणी झाली असली तरी ज्या काही अडचणी राहिल्या असतील त्या अडचणी प्रशासन स्तरावर व गावात येऊन सोडविल्या जातील असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात काम चालू आहे. धरण क्षेत्राच्या आजूबाजूस पोलिसांचा पहारा आहे.
लेंडी धरणाचे काम पुर्ण झाल्यास 26 हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असुन 30 हजार व त्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच मुखेड व देगलुर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मिटणार आहे.
प्रशासनाने ठेवला सुसंवाद ..!
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव यांनी नेहमीच प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद ठेवला. कोणतीही अडचण असल्यास थेट सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पग्रस्त व अधिकारी यांच्याशी थेट संवाद होत असल्याने कोणताही विरोध न होता गळभरणी सुरुवात झाली. मागील 40 वर्षापासुन रखडलेला प्रकल्प अखेर प्रशासनाच्या सुसंवादातून सुटला असे म्हणावे लागेल.
लेंडी प्रकल्पग्रस्त सानुग्रह अनुदानाच्या नोटीसा गावात देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात अनुदान जमा होईल.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने