वीज पारेषण व वितरण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन करण्याचा शासनाचा मानस - पालघर जिल्हाधिकारी
पालघर, 9 मे (हिं.स.)। वीज पारेषाण व वितरण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन करण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस असून याच योजनेचा एक भाग म्हणून पालघर जिल्हयात विविध उति उच्चदाब वीज वाहिन्या उभारण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा जिल्हाध
वीज पारेषण व वितरण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन करण्याचा शासनाचा मानस - पालघर जिल्हाधिकारी


पालघर, 9 मे (हिं.स.)।

वीज पारेषाण व वितरण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन करण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस असून याच योजनेचा एक भाग म्हणून पालघर जिल्हयात विविध उति उच्चदाब वीज वाहिन्या उभारण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी संबंधित वरिष्ठ शासकीय अधिकारी, शासकीय यंत्रणा व प्रकल्पसंस्था समवेत घेऊन संबंधित विभागांना या प्रकल्पाची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीचा उद्देश हा प्रकल्पांच्या उभारणीचा आढावा घेऊन कामकाजातील उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे तसेच विविध यंत्रणांशी समन्वय साधणे हा होता.

प्रकल्पांच्या कामकाजाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी भू-सर्वेक्षणाचे व जमीन मोजणीचे काम तत्काळ पूर्ण करणे, जमिनीच्या मोबदल्याचे दर निश्चित करणे, तसेच वनहक्क कायद्यानुसार (FRA) प्रमाणपत्रास मंजूरी तात्काळ देण्याचे महत्व अधोरेखित केले. एक अभिनव उपक्रम म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व वीज प्रसारण प्रकल्पांच्या समन्वयासाठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तेजस चव्हाण यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली असून ते या प्रकल्पांशी संबंधित सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांशी समन्वय साधतील. तसेच सर्व संबंधित यंत्रणांशी संवाद साधून अडचणींचे वेळेवर निराकरण करण्याची काम देखील करतील.

राज्यबाहेरील वीजनिर्मिती प्रकल्पांतून हरित ऊर्जा आयात करण्यासाठी महाराष्ट्रात उच्चदाब वीज प्रसारण लाईन उभारण्यावर विशेष भर दिला जात आहे. नवीकरणीय ऊर्जेला चालना देणे हे राज्याच्या ऊर्जा धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असून स्वच्छ ऊर्जेचा वाटा वाढविणे, हवामान बदलाचे धोके कमी करणे आणि अंतिमत: ग्राहकांसाठी वीज दर कमी करणे यावर भर दिला जात आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande