राजकोट येथील शिवपुतळ्याच्या पूजनासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री येणार
सिंधुदुर्ग, 9 मे (हिं.स.)। राजकोट येथील शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याच्या पूजनासाठी ११ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मालवणात येत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अन्य मान्यवर येणार आहेत. शिल्पकार राम सुतार यांनी राजकोट येथे जागतिक दर्जाचा पुतळा बनवला आहे. पुढील शेकडो वर्षे हा पुतळा अबाधित राहील. तसेच पुतळा परिसरात लवकरच शिवसृष्टीचीही उभारणी होईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिली.
श्री.राणे म्हणाले, राजकोट येथील पुतळा पडण्याची जी काही घटना झाली होती. या घटनेनंतर जिल्ह्याला जो काही काळा ठिपका लागला होता. तो आता पुसला गेला आहे. शिल्पकार राम सुतार यांनी बांधलेला पुतळा वर्षानुवर्षे पहायला मिळणार आहे. आपणा सर्वांना अभिमान वाटेल असे काम सुतार यांनी केलेलं आहे. फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत पुतळा उभा करण्याचे नियोजन होते. ते आता पूर्णत्वास गेलेले आहे. पुन्हा एकदा त्याच ताकदीने, जगाला हेवा वाटेल असा पुतळा उभारला आहे. यात अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभलं.
राणे म्हणाले, पुतळा पूजन झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर सुशोभिकरण होणार आहे. त्याबाबतची मागणी आमदार निलेश राणे यांनी आमच्याकडे केली आहे. लवकरच त्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर केला जाईल. तर आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभारणीची कार्यवाही होणार आहे. शिवपुतळा परिसरातील जागा संतोष चव्हाण यांच्या मालकीची आहे. त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. बाजारभावाच्या पाच पट दरानुसार जागेचा मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल. केसरकर यांच्या नेतृत्वाखाली श्री.कामत यांनी शिवसृष्टीचा आराखडा तयार केला आहे. हा प्रकल्प शंभर कोटींचा आहे. जागा ताब्यात येताच शिवसृष्टीचेही काम सुरू होईल असे श्री. राणे म्हणाले. दरम्यान गोव्या पेक्षा सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील हॉटेल मालकांनी सकारात्मक तयारी ठेवावी. आपल्या परिसरात वायफाय, स्वच्छता ठेवावी. सरकार म्हणून आपणास हे काही सहकार्य मदत लागेल ती आम्ही देऊ असेही श्री.राणे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी