
पालघर, 9 मे (हिं.स.)।
अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे, सार्वजनिक सुरक्षेची खात्री करण्याचे आणि जेथे आवश्यक असेल तेथे त्वरित मदत पुरवण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे ७६७ हून अधिक घरांचे नुकसान झाले असून, विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे सुमारे ५० मासेमारी नौका देखील नुकसानग्रस्त झाल्या आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.
वादळ आणि पावसामुळे पालघरच्या अनेक तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. एकूण ७६७ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये डहाणू तालुक्यात सर्वाधिक २३० घरांचे नुकसान झाले, त्यानंतर विक्रमगड व वाडा येथे प्रत्येकी ९२, जव्हारमध्ये ८९, मोखाडा येथे ८७, पालघरमध्ये ८५, तलासरीत ६३ आणि वसईमध्ये २९ घरांचे नुकसान झाले आहे.”
६५ वर्षीय मोरेश्वर लोहार वादळी वाऱ्यांमुळे जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेला चुकून पाय लागल्यामुळे मृत्युमुखी पडले. ही घटना वेदी गावात घडली, जेव्हा ते बकऱ्या चारण्यासाठी गेले होते.
डहाणू तालुक्यातील ढाकाटी गावात सुमारे ५० मासेमारी नौका आणि १० ते १२ घरे यावेळी नुकसानग्रस्त झाली आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी परिस्थितीची माहिती घेऊन तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम प्रभावित भागात पाठविण्यात आली आहे.
“प्रशासन नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आहे. शासकीय निकषांनुसार पात्र नागरिकांना योग्य ती भरपाई दिली जाईल. नुकसानमूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.”
हिंदुस्थान समाचार / मेघा माने