
मुंबई, 18 डिसेंबर, (हिं.स.)। विधानसभेत उबाठा गटाचा मतदारांनी गेम केला असून हा गट संपविण्याचा उरलेला टप्पा मतदार महापालिका निवडणुकीत पूर्ण करणार आहेत, असा प्रहार भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राज ठाकरे हे ही पूर्वीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी उबाठा गटाशी युती करणार नाहीत, असेही श्री. बन यांनी सांगितले .
श्री. बन म्हणाले की, उबाठा गटाचा त्यांच्या मित्रपक्षानेही टप्प्याटप्प्याने गेम केला आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईत स्वबळाची भाषा केली. नंतर दुस-या टप्प्यात काँग्रेसने उबाठाला मनसे सोबत जोडून देऊन गेम करण्याचा डाव टाकला आहे. 2017 मध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या टाळीला उद्धव यांनी प्रतिसाद न दिल्याचा बदला आता राज ठाकरे घेतील.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीच्या सुरुवातीलाच पत्रकार परिषदांमधून खा. संजय राऊत यांना अपयशाची खात्री असल्याने त्यांची अस्वस्थता प्रकर्षाने दिसत आहे. सतत वायफळ बडबड करणा-या राऊतांना पत्रकारांनी मुंबईचा महापौर कोणाचा होणार. उबाठा गटाचा होणार का मनसेचा होणार हा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर देणे राऊतांनी सोईस्करपणे टाळले, याकडे श्री. बन यांनी लक्ष वेधले.
*फडणवीस सरकार कोणाला पाठीशी घालत नाही*
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर लागलीच त्यांच्याकडून खाती काढून घेतली आहेत. कोकाटेंबाबत कोर्टाची मूळ प्रत आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य ती कारवाई करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दोषींवर योग्य कारवाई होते कोणाची हयगय केली जात नाही असेही श्री. बन यांनी ठामपणे सांगितले. नवाब मलिक यांच्यावर आरोप झाल्यावर मविआ सरकारने त्यांचा राजीनामा घेण्याची तसदी ही घेतली नव्हती. म्हणूनच या बाबत राऊतांनी आम्हाला फुकाचे सल्ले देऊ नयेत असे श्री. बन यांनी खडसावले.
भाजपा शिंदेंचा पक्ष गिळणार या राऊतांनी केलेल्या टीकेला सणसणीत उत्तर देत श्री. बन म्हणाले की भाजपा कधीही कोणाचा पक्ष गिळंकृत करत नाही. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या कर्माने शिवसेना संपवली. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसले तेव्हाच उद्धव यांनी शिवसेना संपवली. पक्ष फोडीची सुरुवात उद्धव यांनीच मनसेचे सात नगरसेवक फोडून केली होती यांची आठवण ही श्री. बन यांनी करून दिली.
*ड्रगमुक्त महाराष्ट्रासाठी भाजपा कटीबद्ध*
ड्रग्सच्या विळख्यात महाराष्ट्र सापडला या राऊतांच्या टीकेवर श्री. बन यांनी पलटवार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ड्रग्सविरोधात सक्षमपणे पावले उचलत आहेत. ड्रगमुक्त महाराष्ट्रासाठी भाजपा कटीबद्ध आहे. पोलीस योग्य ती चौकशी, तपास आणि दोषींवर कारवाई करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर