ठाणे - अजय जेया फाऊंडेशन ठेवणार निवडणूक प्रक्रियेवर नजर
ठाणे, 18 डिसेंबर, (हिं.स.)। गेल्या काही वर्षांपासून सामान्य जनतेत निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे माॅडेल कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शी कशी होईल, याकडे अजय जेया फाऊंडेशन लक्ष ठेवणार असून बोगस मतदान, प
ठाणे


ठाणे, 18 डिसेंबर, (हिं.स.)। गेल्या काही वर्षांपासून सामान्य जनतेत निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे माॅडेल कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शी कशी होईल, याकडे अजय जेया फाऊंडेशन लक्ष ठेवणार असून बोगस मतदान, पैसे वाटप , निवडणूक आयोगाकडून पक्षपात किंवा गैरव्यवहार याविरोधातही फाऊंडेशन ठाम भूमिका घेऊन लढणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अजय जेया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून अजय जेया हे ठाण्यातील नागरी समस्या, भ्रष्टाचार याविरोधात लढा देत आहेत. फाऊंडेशनच्या वतीने देशात प्रथमच दोन भागात भ्रष्टाचार प्रदर्शन भरवून छायाचित्रांच्या माध्यमातून ठाणे महानगर पालिकेतील अनियमितता जनतेसमोर उघड केली होती. या प्रदर्शनात लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी डिजिटल जाहिरात फलक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, बाकडे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. तसेच, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक व्यवस्थेतील कमतरता आणि कामचुकारपणा, टोविंग व्हॅन याविरोधात अजय जेया यांनी जनआंदोलन उभे केले आहे. निवडणुकांच्या तोंडावर अजय जेया फाऊंडेशनने निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली राबवून सुशिक्षित, स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अजय जेया फाऊंडेशन प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार नसले तरी योग्य उमेदवार आणि लोकशाहीभिमुख निवडणूक प्रक्रियेसाठी काम करणार आहे.

याबाबत अजय जेया म्हणाले की, ठाणेकर नागरिकांना रस्ते, ड्रेनेज, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि रोजगार यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करून मतदान करण्याचे आवाहन केले. जात आणि धर्म यांचा या निवडणुकीशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, फाउंडेशन कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. पक्ष न पाहता, प्रामाणिक आणि जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिला जाईल. त्याचबरोबर, ठाणे महानगरपालिकेत स्थान मिळवू नये असे वाटणाऱ्या भ्रष्ट किंवा निष्क्रिय उमेदवारांना उजेडात आणले जाईल. अजय जेया फाउंडेशन हे देखील मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शकपणे होईल याची दक्षता घेईल. कोणत्याही पक्षाद्वारे घूसखोरी, बेकायदेशीर पैसे देणे किंवा इतर गैरव्यवहार सहन केले जाणार नाहीत. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा किंवा गैरव्यवहार झाल्यासही फाउंडेशन आपली भूमिका ठामपणे मांडेल.

विविध पक्ष हे राजकीय धोरण आणि जिंकण्याच्या क्षमतेवर आधारित निर्णय घेतो, सर्व उमेदवारांचा गुण किंवा कार्य पाहत नाही. त्यामुळे जनतेची कामे करणारे उमेदवार हे पक्षाच्या भूमिकेपेक्षा अधिक महत्वाचे आहेत. म्हणूनच उमेदवार पक्षाचा असो वा नसो, पण, निर्भय आणि भ्रष्टाचारमुक्त प्रतिनिधित्व प्रभागाला मिळावे, या धोरणातून या निवडणुकीत अजय जेया फाउंडेशन प्रामाणिक उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी स्वतंत्रपणे काम करेल. ठाणेकरांनी शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुज्ञ आणि जबाबदार उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन अजय जेया यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande