अमरावती, 9 मे, (हिं.स.)
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. त्यामुळेच धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्याकडे आहे. ते जनतेच्या न्यायालयात गेले, जनतेने त्यांना कायमचे घरी बसवले. घरी बसणाऱ्याला लौक मतदान करीत नाहीत. आता नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता केली.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, संजय राठोड, आशीष जयस्वाल, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजीत अडसूळ आदी उपस्थित होते.
आमच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या, पण जे सांगत होते, आम्ही एकही जागा जिंकणार नाही, ते शंभर जागा लढले आणि केवळ २० ठिकाणी जिंकले. अत्यंत कमी मतांनी आमचा सात-आठ जागांवर पराभव झाला, अन्यथा यापेक्षाही कमी जागा त्यांना मिळाल्या असत्या असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे कायकर्ते हे जनसेवेसाठी लोकांच्या दारात आहेत. कार्यकर्ता हा लोकांच्या दारात शोभून दिसतो, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांचेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्ही 'शासन आपल्या दारी' ही योजना घेऊन आलो. ५ कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. पण, काही लोक घराच्या बाहेर पडत नाहीत आणि पडले, तर थेट विदेशातच जातात, असा टोला शिंदे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या युरोप दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, माजी आमदार दिवंगत संजय बंड हे सच्चे शिवसैनिक होते. पण, त्यांना काय मिळाले. एखादा कार्यकर्त्याला धुळीला कसे मिळवायचे, याचे क्लासेस जर लावयाचे असतील, तर मुंबईमध्ये बांद्रा येथे एकच ठिकाण आहे. आमची कुठेही शाखा नाही, असे ते मिश्कीलपणे म्हणाले.संजय बंड यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे होते, पण ताटातले काढून, वाटीतले काढून घ्यायचे ही सवयच काही लोकांना लागलेली आहे. पण आता प्रीती बंड यांनी पदर खोचलेला आहे. हातात धनुष्यबाण घेतलेला आहे. आता तुम्हाला पुर्वीचा अनुभव येणार नाही. तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीचा झेंडा फडकवा
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून कार्यकर्त्यांच्या निवडणुकाकरिता नेत्यांनी सज्ज व्हावे व महायुतीचा झेंडा फडकवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. भारतीय सैन्याने गोळीचा जवाब मिसाइलने दिला आहे. पाकिस्तान पोकळ घोषणा करीत आहे. पाकिस्तानच्या बुडाखाली काय जळत आहे, ते त्यांनी पहाव. आता पूर्वीचा भारत राहिला नाही. पाकड्यांना घुसके मारणारा भारत आहे. पाकिस्तानबद्दल देशात उद्रेक व बदल्याची भावना होती. देश पाठीशी उभा आहे. भारताच्या हल्ल्यात केवळ दहशतवादी मारले गेले, अतिरेकी अड्डे उध्वस्त केले. यापुढेही जे काही होईल ते देशाच्या भल्यासाठी व रक्षणासाठी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय बंड हे मोठं नावजीवनातील नवीन सुरुवात असून आज महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना शिंदे गटात येण्याकरिता विचार करायला वेळ लागला नाही. कारण बाळासाहेबांचे विचार मनात रुजलेले आहेत. संजय बंड हे विद्यार्थी सेनेपासूनच कार्यरत होते. - पंधरा वर्षे आमदार राहिले. शिवसेना बळकट केली. प्रीती बंड मोठं नाव नाही मात्र संजय बंड या नावाची संपूर्ण जिल्ह्यात छाप आहे. त्यांचं वलय मोठ आहे, असे प्रीती बंड यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर सांगितले.
शिंदे एकनाथ नाहीत तर लोकनाथ : आनंदराव अडसूळ
अभिजीत अडसूळ यांना काही लोकांमुळे पराभव पत्करावा लागला. मलाही हरवल्या गेले. आता जिल्ह्यात शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही, ही खंत आहे. प्रीती बंड निवडून येणार असं वातावरण होतं. त्यांनी ६५ हजार मते घेतली. प्रीती बंड यांचं धनुष्यबाण चिन्ह असतं तर त्या नक्कीच निवडून आल्या असत्या. तळागळातील माणसाला न्याय देणारं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत ते एकनाथ नाहीत तर लोकनाथ असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा अनुसूचित जाती जमाती समितीचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी