नागपूर, 09 मे (हिं.स.) : केरळ येथील विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता रजाज एम. शीबा सिद्दीक आणि त्याच्या महिला साथीदाराला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारत सरकारच्या विरोधात युद्धाचे आरोप आहे. सिद्दीक प्रकरण वाटते तितके सोपे नसून त्याच्या मागे कोण-कोण आहेत. याचा तपास करणे अतिशय आवश्यक असून या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी केली आहे.
नागपुरातील लकडगंज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 149 (भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी), 192 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), 351 (1) (गुन्हेगारी धमकी देणे) आणि 353 (बी) आणि 67 अंतर्गत सिद्धिकला अटक केली आहे. रजाज एम. शीबा सिद्दीक हा मकतूब मीडिया' आणि द ऑब्झर्व्हर पोस्ट' सारख्या माध्यमांसाठी लिहायचा. यामध्ये जातीय भेदभाव, सांप्रदायिक हिंसाचार, राज्य दडपशाही आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांशी संबंधित कथा समाविष्ट आहेत. केरळमधील एडापल्ली येथील रहिवासी असलेल्या रजाज एम. शीबा सिद्दीक सोबत, नागपूरमध्ये राहणारी त्याची मैत्रीण ईशा कुमारी हिलाही अटक करण्यात आली आहे. हा इसम अर्बन नक्षलवादी असून कुठल्या तरी मोठे षडयंत्र आखण्यासाठी तो नागपुरात वास्तव्याला असावा. शांतीप्रिय नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी हिंसाचार घडला होता. तसेच नागपुरात पवित्र दीक्षाभूमी, संघाचे मुख्यालय, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे होम टाऊन आहे. त्यामुळे देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात हा इसम काय करीत होता...? त्याचे साथीदार आणि पाठिराखे कोण-कोण आहेत.. ? त्यासोबतच त्याचे कुणा-कुणाशी संपर्क असून त्याचा नेमका हेतू काय होता.. ? हे तपासणे फारच आवश्यक आहे. सिद्दीक केवळ हिमनगाचे टोक असेल याचे खरे साथीदार कोण.. ? त्यांची नेमकी योजना काय.. ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी रजाज एम. शीबा सिद्दीक आणि ईशा कुमारी यांची सीआयडी चौकशी केली पाहिजे अशी मागणी शिर्के यांनी केली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी