नाशिक, 12 जून (हिं.स.)।नाशिकमध्ये रविवारी १५ जून रोजी एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक' ही राष्ट्रीय दुचाकी रॅलीची दुसरी फेरी रंगणार असून इंदोर पाठोपाठ नाशिकमध्ये या स्पर्धेला स्पर्धकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. त्र्यंबकेश्वर नगरीपासून काही अंतरावर असलेल्या आंबोली ते हरसूल जवळच्या गावांमध्ये रविवारी सकाळी राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार रंगणार आहे. शनिवारी सकाळ पासून शिखरे फार्म्सचे श्रीहरी लॉन्स अंबोली येथे या रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या कागदपत्रांची छाननी तसेच गाड्यांची स्पर्धापूर्व वाहन तपासणी घेण्यात येणार आहे. नाशिकच्या एडब्लयू इव्हेट्सच्या वतिने यंदाच्या हंगामातील शेवटच्या दोन फेऱ्यांपैकी मायभूमीत आणखी एक राष्ट्रीय अजिंक्यपदाची फेरी आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. एफएमएससीआयच्या मान्यताने एम आर एफ मोग्रीप, टीव्हीएस अपाचे आरटीआर, गॉडस्पीड रेसिंग, महेंद्र बच्छाव ग्रुपच्या आंबोली वीकेंड होम्स, गोदा श्रद्धा फौंडेशन आणि शिखरे फार्मच्या श्रीहरी लॉन्स या प्रयोजकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या १० गटात रॅली रंगणार आहे. याही हंगामात महिलांचा स्वतंत्र गट सुरू करण्यात आला आहे. स्टार ऑफ महाराष्ट्र या राज्यभरातल्या खेळाडूंच्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ११ सकाळी ७ - ३१ वाजता श्रीहरी लॉन्स येथून वाघेरा घाट मार्गे पहिली वीर नगर आडगाव देवळा फाटा च्या दिशेने रवाना होईल. प्रेक्षकांना विदेशी बनावटीच्या दुचाकी सोबतच स्कूटरच्या थरारक रायडिंगची लज्जत अनुभवायला मिळेल. सकाळी ८-३० वाजता वीर नगर आडगाव देवळा फाटा येथून रॅलीचा स्पर्धात्मक प्रारंभ होईल त्यामुळे प्रत्यक्ष रॅली मार्गावर जाऊन स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता प्रेक्षकांना रॅली सुरू होण्याच्या एक तास अगोदर स्पर्धा मार्गावर प्रवेश दिला जाईल. त्यानंतर सर्वांकरिता स्पर्धा मार्ग बंद करण्यात येईल व पूर्णत: निर्मनूष्य केलेल्या रस्त्यावर स्पर्धा घेतली जाईल. या मार्गावर जनावरे व खासगी अशी कोणत्याही स्वरूपाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असून त्याकरिता कार्यकर्त्यांची मोठी फळी तैनात करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचा स्पर्धात्मक मार्ग त्र्यंबकेश्वर आणि हरसूल च्या दरम्यान वीरनगर – आडगाव देवळा फाटा – खरवळ - खरवळचा फणसपाडा फाटा – नांदगाव कोळी खरवळ फाटा – वरस विहीर – नांदगाव कोळी -हेदुलीपाडा दरम्यान असणार आहे. नंतर हे स्पर्धक हर्सूल अंबोली विकेंड होम येथे सर्विस साठी येतील, अशा पद्धतीने हा मार्ग स्पर्धक ३ वेळा पार पाडणार आहे. यंदाच्या हंगामात राष्ट्रीय गटाच्या एकूण ९ गटांपैकी ५ गटांमध्ये शर्तीची चुरस जेते पद जिंकण्यासाठी बघण्यात येणार आहे. स्कूटर गटात स्पर्धकांचा मोठा दबदबा असून यंदाच्या हंगामाचा तृतीय क्रमांकाचा नाशिकचा शमीम खान -पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग आणि प्रथम स्थानावर असलेला पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग चा सय्यद असिफ अली कशा पद्धतीने टक्कर देतात हे बघणे रंजक ठरेल. महिला गटात टीव्हीएस रेसिंगच्या पी.एम.ऐश्वर्याच्या कौशल्याचे आपणास पुन्हा बघता येणार आहे. स्पर्धेत एकुणच पेट्रोनास टीव्हीएस विरुद्ध हिरो मोटरस्पोर्ट्स विरुद्ध व्ही एम मोटरस्पोर्ट्स या टीमच्या स्पर्धकांमधला सर्व गटातील मुकाबला रंगतदार ठरेल.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI