लंडन , 13 जून (हिं.स.)।बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. ५३व्या वर्षी त्यांनी इंग्लंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. पोलो गेम खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संजय कपूर हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यांना पोलो गेम खेळण्याची आवड होती. मात्र, आपला आवडता खेळ खेळतानाच त्यांना मृत्यूने गाठलं. बिजनेसमॅन संजय कपूरने करिश्मा कपूरशी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यामुळे २०१४ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते. करिश्माने त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक हिंसाचाराचे आरोपही लावली होते. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत.करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं.करिश्माच्या आधी त्याने डिझाईनर नंदिता मेहतानीशी लग्नगाठ बांधली होती. संजयचे आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले होते. त्यांचे अचानक निधन त्यांच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि प्रियजनांसाठी मोठा धक्का आहे. संजयच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर लोक दुःख व्यक्त करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode