चंद्रपूर, 14 जून (हिं.स.)। जिल्ह्यात 16 ते 22 जून या कालावधीत पीक कर्ज वाटप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्ज वाटप मेळाव्यात या बाबींचा अंतर्भाव करावा असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या बाबींचा करावा अंतर्भाव-
1. शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्ज अर्जाची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे, 2. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना याची पूर्वकल्पना देऊन त्यांचा सहभाग वाढवावा, 3. सर्व बँक शाखांनी कर्ज प्रस्तावांची छाननी व मंजुरी प्रक्रियेसाठी तयारी ठेवून मेळाव्यात कर्जाचे वितरण करावे, 4. किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी कुक्कुटपालन व्यवसायात खेळतं भांडवली कर्ज सर्व बँकामार्फत उपलब्ध आहेत, याची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, 5. शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक पोर्टलवर फार्मर आयडी करून देण्यात यावे.
पीक कर्जाकरिता लागणारी कागदपत्रे : 1. आधारकार्ड, 2. पॅन कार्ड, 3. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, 4. बँक पासबुकची प्रत, 5. 7/12 उतारा, 6. नमुना 8अ, 7. कर्ज नसल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र.
उपरोक्तप्रमाणे कागदपत्रे शेतकऱ्यांनी सदर मेळाव्यात सोबत आणण्यासाठी महसुल, ग्राम विकास, सहकार आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी याबाबतची प्रचार प्रसिध्दी करावी. वरील नियोजन यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व बैंक प्रतिनिधींनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी. तसेच या मेळाव्याच्या फलनिष्पत्तीबाबत प्रत्येक बँक शाखा व्यवस्थापकाने पीक कर्ज वाटपाचा दैनंदिन अहवाल संबंधित तहसीलदारांना तसेच अहवालाची एक प्रत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बैंक ऑफ इंडीया, चंद्रपूर यांच्याकडे संकलनासाठी सादर करावा, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव