जळगाव, 14 जून, (हिं.स.) - रावेर तालुक्यातील तासखेडा येथे विजेचा धक्का बसून पित्यासह लेकीचा करुण अंत झाला. समाधान अशोक कोळी (३६) आणि त्यांची मुलगी मानवी कोळी (११) अशी या मृतांची नावे आहेत. समाधान यांच्या वडिलांनाही सुरुवातीला विजेचा धक्का बसला होता, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली.
समाधान यांचे वडील अशोक माधव कोळी हे घरात कापडे टांगण्यासाठी बांधलेल्या तारेवरील रुमाल घेण्यासाठी गेले असता त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. रुमालाला स्पर्श होताच तार तुटली आणि ते बाजूला फेकले गेले. हा प्रकार पाहताच समाधान व मानवी हे त्यांना उचलण्यासाठी पुढे आले.त्यांना तुटलेल्या तारेचा स्पर्श झाला आणि ते तिथेच तारेला चिकटले. त्यांना रुग्णालयात आणले असता मृत घोषित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर