अहमदाबाद, 15 जून (हिं.स.)।अहमदाबाद विमान दुर्घटना होऊन चार दिवस उलटून गेले आहेत. अजुनही या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.अशातच या दुर्घटनेनंतर प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक महेश कालावाडिया बेपत्ता झाला आहे अशी बातमी समोर आली आहे. महेश दुर्घटनाग्रस्त विमानात नव्हता, तरीही या दुर्घटनेनंतर तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेऊन काळजी व्यक्त करत आहेत.
लोकप्रिय संगीत दिग्दर्शक महेशच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, महेशने अपघाताच्या काही मिनिटं आधी १.१० मिनिटांनी त्याची पत्नी हेटलशी संपर्क केला होता. लॉ गार्डनजवळील एका मीटिंगमधून महेश घरी येत होता. परंतु काही क्षणात त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर महेशसोबत कोणताच संपर्क होऊ शकला नाही. महेशचं शेवटचं लोकेशन विमान दुर्घटनाग्रस्त भागापासून ७०० मीटर अंतरावर होतं. कुटुंबाने आसपासच्या रुग्णालयांमध्ये, शवागारात, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शोध घेतला, पण अजूनपर्यंत महेशचा कुठेही ठावठिकाणा लागलाच नाही.
या गंभीर घटनेमुळे संगीत दिग्दर्शक महेश कालावाडियाच्या कुटुंबामध्ये काळजी अन् भीतीचं वातावरण आहे. एका क्षणात संपर्क तुटला आणि पुढे काहीच संपर्क झाला नाही. आता आम्हाला फक्त एकच आशा आहे की, महेश सापडेल, असं महेशचा भाऊ कार्तिक म्हणाला. सध्या पोलीस अधिकारी महेशचा शोध घेत आहेत. त्यांनी गुन्हा दाखल केला असून डिएनएच्या साहाय्याने महेशचा शोध घेणे, शक्य होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संगीत दिग्दर्शक महेश लवकरच सापडेल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आणि उत्सुकता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode