नागपुरात संघ आणि भाजपची समन्वय बैठक
- गडकरी आणि फडणवीसांचीही बैठकीला हजेरी - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे नियोजन - पक्ष कार्यकर्त्यांना घरोघरी संपर्काचे दिले टार्गेट नागपूर, 15 जून (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीतील एकाकी ठरल्याने झालेली भाजपची पिछेहाट आणि संघाच्या बळावर विधानसभा
भाजपा लोगो


- गडकरी आणि फडणवीसांचीही बैठकीला हजेरी

- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे नियोजन

- पक्ष कार्यकर्त्यांना घरोघरी संपर्काचे दिले टार्गेट

नागपूर, 15 जून (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीतील एकाकी ठरल्याने झालेली भाजपची पिछेहाट आणि संघाच्या बळावर विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश यापार्श्वभूमीवर संघाने आता भाजपला प्रत्येक निवडणुकीत मदत करण्याचे ठरवले आहे. त्यातून आज, रविवारी नागपुरातील रेशीमबाग परिसरामधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भाजप कार्यकर्ते आणि संघाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

संघ परिवारातील सर्व संघटनांची विशिष्ट कालावधीनंतर बैठक होत असते. त्याच मालिकेत रविवारी झालेली भाजपची बैठक विदर्भ प्रांत स्तरीय असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत राजू तोडसाम, मंत्री पंकज भोयर, आमदार संजय कुटे, किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार आमदार समीर कुणावार, डॉ नरोटी, मंत्री अशोक उईके, सुमित वानखेडे, मंत्री आकाश फुंडकर माजी खासदार हंसराज अहिर, आमदार आशिष देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे

दीपक तामशेट्टीवर, राम हरकरे, अतुल मोघे यांच्यासह अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्‍थित होते.

राज्य शासनाने 10 जून रोजी रात्री उशिरा महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभागरचना करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर झालेल्या या समन्वय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या अपूर्ण टास्कवरून कानपिचक्या देण्यात आल्या. गडकरी आणि फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी त्रुटी व उणिवांची जाणीव करून देण्यात आली. तसेच येत्या 3 महिन्यात काय-काय करायचे आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. एकीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘काय करायचे’ याबाबत कार्यकर्त्यांना सुतोवाच केले असतानाच संघाकडून “कसे करायचे”..? यासंदर्भात मार्गदर्शन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आगामी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी सुमारे 3 महिन्यांचा अवधी मिळाला आहे. याकाळात घरोघरी संपर्क करून पक्षाच्या कार्याचा प्रसार-प्रचार करण्याचे टास्क कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. या बैठीकत संघाने गेल्या 5 वर्षात केलेले सुक्ष्म निरीक्षण आणि त्यानुषंगाने केलेली मायक्रो-प्लानिंग यावर प्रकाश टाकण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande