बंगळुरू, 16 जून (हिं.स.) : कर्नाटकात आज, सोमवारपासून बाईक टॅक्सींवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात बाईक टॅक्सी असोसिएशनने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे.
कर्नाटक सरकारने सोमवारपासून (16 जून) बाईक टॅक्सींवर पूर्ण बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात नम्मा बाईक टॅक्सी असोसिएशनने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सरकारकडून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. रॅपिडो, ओला आणि उबर मोटो सारख्या बाईक टॅक्सी सेवा बेकायदेशीर घोषित करणाऱ्या सरकारी आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयाने 13 जून रोजी कायम ठेवल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जून रोजी होणार आहे. यासोबतच बंगळुरूत रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाकडून एका महिलेल्या मारहाण झाल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने चालकाकडे वेगाने आणि बेपर्वाईने गाडी चालवल्याबद्दल तक्रार केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला, ज्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चालकाने महिलेला चापट मारली, ज्यामुळे ती जमिनीवर खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ एका वाटसरूने रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये जवळ उभे असलेले अनेक लोक देखील दिसत आहेत. सुरुवातीला महिला तक्रार करण्यास कचरत होती, परंतु नंतर पोलिसांच्या समजूतदारपणामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी