नाशिकरोड, 16 जून (हिं.स.)।
शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी न दिल्यामुळे माजी मंत्री बबनराव घोलप नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र नंतर तेथे मन न रमल्याने पुन्हा ठाकरे गटात आलेले घोलप पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. जनतेची कामे करण्यासाठी आता त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागच्याच आठवड्यात उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली होती, ते देखील भाजपच्या वाटेवर असतानाच बबन घोलप यांचीही वाटचाल भाजपकडे आहे. दुसरीकडे शरद पवार गटात असलेले अशोक सातभाई यांनीही शरद पवार गट सोडण्याचा निर्णय घेतला असून ते देखील भाजपात प्रवेश करणार आहेत.
बबन घोलप हे माजी मंत्री असून त्यांचा मुंबईत लवकरच प्रवेश सोहळा होणार असल्याने भारतीय जनता पार्टी नाशिक महापालिकेच्या दृष्टीने जोरदारपणे कामाला लागली असून संघटन वाढीसाठी इतर पक्षातील नाराजाना खेचत आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI