मुंबई, २ जून (हिं.स.) : १९८१ साली प्रदर्शित झालेला आणि रेखाच्या अत्यंत देखण्या अभिनयासाठी ओळखला जाणारा 'उमराव जान' हा चित्रपट ४के स्वरूपात पुनर्संचित करून २७ जूनला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील गझल - दिल चीज क्या है, इन आंखों की मस्ती आणि जुस्तजू जिसकी थी आजदेखील लोकप्रिय आहेत.
नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी पुनर्संचयित केलेल्या या चित्रपटासोबतच दिग्दर्शक मुजफ्फर अली एक खास ‘कॉफी टेबल बुक’ देखील प्रकाशित करणार आहेत. या पुस्तकात चित्रपटाच्या निर्मितीमागील छायाचित्रे, पोशाख रेखाचित्रे, सुलेखन, कविता आणि सेटवरील वैयक्तिक आठवणींचा समावेश असेल.
या पुनर्प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर रेखा म्हणाल्या, “उमराव जान आजही माझ्यात जिवंत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहणं म्हणजे जुनं प्रेमपत्र नव्या पिढीने उघडून पाहणं आहे.”
फारुख शेख, नसीरुद्दीन शाह, राज बब्बर यांसारख्या कलाकारांनी सजवलेल्या या चित्रपटातून फर्रुख जाफर यांनी पदार्पण केलं होतं. या क्लासिक चित्रपटात रेखाने साकारलेली गणिका-कवयित्रीची भूमिका चित्रपट इतिहासातील सर्वोत्तम अभिनयापैकी एक मानली जाते. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी