ठग लाइफ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कमल हसन यांना कोर्टाने सुनावले खडेबोल
बंगळूरू , 3 जून (हिं.स.)।काही दिवसांपूर्वी दक्षिण भारताचे सुपरस्टार अभिनेता कमल हासन यांनी कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे वादग्रस्त विधान केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक सरकारने त्यांच्या ठग लाइफ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर ब
Kama hasan


बंगळूरू , 3 जून (हिं.स.)।काही दिवसांपूर्वी दक्षिण भारताचे सुपरस्टार अभिनेता कमल हासन यांनी कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे वादग्रस्त विधान केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक सरकारने त्यांच्या ठग लाइफ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात हसन यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, परंतु आता न्यायालयानेही या प्रकरणात कठोर भूमिका घेतली.

कर्नाटक उच्च न्यायालयाने कमल हसन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना तीव्र शब्दांत निषेध केला. कन्नड भाषेचा जन्‍म हा तामिळ भाषेमधून झाला आहे, असे विधान तुम्‍ही कोणत्‍या आधारावर केलं? तुम्ही इतिहासकार आहात का? की भाषाशास्त्रज्ञ?. तुम्ही कोणत्या आधारावर कर्नाटकच्या लोकांच्या भावनांना दुखावल्या ? कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेतून जन्माला येऊ शकत नाही. या (दाव्या) ला समर्थन देण्यासाठी कुठून साहित्य आणले?, अशी प्रश्‍नांची सरबत्ती करत कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने अभिनेते कमल हसन यांची हजेरी घेतली. तसेच न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांची माफी मागण्यास हसन यांनी नकार दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत म्हटले की, तुम्ही कमल हसन असाल, पण तुम्हाला लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही. कोणत्याही नागरिकाकडे इतरांच्या भावना दुखावण्याचा अधिकार नसतो. नागरिकांसाठी पाणी, जमीन आणि भाषा अत्यावश्यक असतात. या देशाचे विभाजनसुद्धा भाषेच्या आधारावरच झाले होते.

कर्नाटक सरकारकडून त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्यानंतर हसन यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता आणि न्यायालयाला विनंती केली होती की, राज्यात त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शन आणि स्क्रीनिंगसाठी योग्य त्या दिशा-निर्देशांची हमी दिली जावी. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून या प्रकरणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले की, चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखता येणार नाही. ना केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सकडून आणि ना कर्नाटक सरकारकडून याला रोखता येईल. अभिनेत्याने फक्त एक विधान केले आहे. कोणत्याही भाषेचा अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. यावर उच्च न्यायालयाने म्हटले की, पण अभिनेत्याने (हसन) अजूनपर्यंत कोणतीही माफी मागितलेली नाही. तुम्ही कमल हसन असू शकता? तुम्ही कोणीही असू शकता? पण तुम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही अधिकार नाही.

उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, अशा काही गोष्टी असतात ज्या लोकांच्या भावना अत्यंत तीव्रपणे प्रभावित करतात. या देशाचे विभाजनसुद्धा भाषिक आधारावरच झाले होते. आपला देश ह्याच कारणावरून विभागला गेला होता. त्यांच्या विधानामुळे पहा काय काय झाले? एक अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि कर्नाटकचे लोक काय मागत आहेत? फक्त माफी! या सुनावणीदरम्यान कमल हसन यांचे वकील यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, आम्ही सध्या तरी कर्नाटकात चित्रपट प्रदर्शित करणार नाही. दरम्‍यान, कमल हसन यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर अद्याप निर्णय दिलेला नाही. कमल हसन यांनी माफी मागण्याचा विचार करावा, असे खंडपीठाने म्‍हटले आहे.

चित्रपट ‘ठग लाइफ’ बद्दल बोलायचं झालं, तर सुमारे 38 वर्षांनंतर कमल हसन हे दिग्गज चित्रपट निर्माते मणि रत्नम यांच्यासोबत पुन्हा एकत्र आले आहेत. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर बॉलिवूडमधून अभिनेता अली फजल, पंकज त्रिपाठी आणि रोहित सराफ सुद्धा या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande