पुणे, 30 जून (हिं.स.) : पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनांमध्ये ठवसणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही.
या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्व तर अधोरेखित केलेच आहे, परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल, असा विश्वास या चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला. चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या वेळी या सिनेमाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव, भारत टिळेकर, डीओपी करण तांदळे, संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे, अभिनेता रोहित पवार, लाईन प्रोड्यूसर चेतन परदेशी, असोसिएट दिग्दर्शक रहेमान आदी उपस्थित होते. दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून सिनेमाची थीम डोक्यात घोळत होती. स्वच्छता हा विषय पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे. आजही देशात एकीकडे स्वच्छतेसंदर्भात आपल्याला मोठे काम करावे लागणार आहे. तर, दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याकडेही आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनातून पहावे लागणार आहे. कचरा वेचणारे आले की आपण कचरेवाला किंवा कचरेवाली आली असे म्हणतो. परंतु तसे न म्हणता स्वच्छता करणारे आले, असे म्हणण्याची गरज आहे. याचाच अर्थ आपल्याला आपल्या मनात असलेला कचरा किंवा जळमटे काढून फेकण्यास बाध्य करणारा हा सिनेमा आहे. शिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांना समाजात वावरताना किंवा दैनंदिन जीवनात खूपच संघर्ष करावा लागतो, त्याचेही चित्रण सिनेमात उत्तमरित्या केलेले आहे. ते पुढे म्हणाले की, सिनेमातील गीते अत्यंत अप्रतिम असून, बॉलिवूड चे दिग्गज गायक कैलाश खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गीतांना आवाज दिलेला आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे दक्षिण भारतात तयार करण्यात आलेले असल्याने उत्कृष्ट कथानक आणि संगीताचा सुरेल मिलाफ असलेला ‘अवकारीका’ हा सिनेमा आहे.
या सिनेमाला अनेक दिग्गजांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सिनेमाच्या प्रोमोशनसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. चित्रपटात विराट मडके, राहुल फलटनकर, रोहित पवार, डॉ. नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, पंकज धुमाळ, विनोद खुरुंगळे, पिया कोसुंबकर, स्नेहा बालपांडे, वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे यांच्या भूमिका असून ‘अवकारीका’ येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला कैलास खेर यांनी स्वरसाज चढवलेला आहे. यापूर्वी आलेल्या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन्ही गाणी रेडबड युट्यूब चॅनल वर आणि अन्य सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचे अरविंद भोसले यांनी सांगितले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मेघा माने