सोलापूर, 30 जून (हिं.स.)।
कमी दिवसांत जादा पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून सोलापूर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक जणांना ३६ कोटींचा गंडा घालणाऱ्या २३ जणांविरुद्ध पोलिसांनी माढा न्यायालयात तब्बल चार हजार ९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कुर्डुवाडी, बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांनी एकमेकांच्या ओळखीतून तरुणांना जादा नफ्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. एक रुपयाला ३६ रुपये मिळतात, असे त्यांचे आमिष होते.
ऑफलाइन मटका, जुगार खेळणाऱ्यांवर पोलिस उघडपणे कारवाई करतात म्हणून संशयित आरोपींनी ऑनलाइन चक्री गेमचा पर्याय शोधून काढला. एकमेकांच्या ओळखीतून त्यांनी सधन भागात एजंट तयार केले. त्यासाठी त्यांच्या माध्यमातून लोकांनी गुंतवलेल्या एकूण रकमेवर कमिशन देऊ केले. कमी दिवसांत गुंतवलेल्या रकमेवर ३६ पट रक्कम मिळते म्हणून सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः: बार्शी, माढा, माळशिरस अशा तालुक्यांमधील शेकडो तरूणांनी त्या चक्री गेममध्ये पैसे गुंतवले. त्यासाठी पैसे गुंतवणूक करेपर्यंत त्यांना पासवर्ड व आयडी दिला जात होता. अनेकांनी या गेमच्या नादात शेती, घरजागा विकली. अनेकांनी शेतावर कर्ज काढले, सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतले. काहींनी घरातील दागिने विकले, गहाण ठेवले आणि पैसे त्या गेममध्ये गुंतवले.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड