
रत्नागिरी, 7 जून, (हिं. स.) : विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत लांजा कृषी विज्ञान केंद्र, रिलायन्स फाउंडेशन, कृषी विभाग, आत्मा व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप भात लागवडीविषयी लांजा तालुक्यातील पुनस, वीरगाव व देवधे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी देवधे कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. महेश महाले यांनी शेतकऱ्यांना विकसित भारत संकल्प अभियानाचे महत्त्व पटवून दिले. भात बीजप्रक्रिया, सुधारित लागवड पद्धती तसेच खताचा संतुलित वापर याबद्दल माहिती दिली. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या रत्नागिरी ८ व ६ इतर वाणांबद्दल माहिती दिली. डॉ. वैभव येवले यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध अॅण्ड्रॉइड ॲपची माहितीही दिली.
कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी ६ बियाण्यांचे वितरण करण्यात आले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदअंतर्गत केंद्रीय मत्स्यकी शिक्षा संस्थानचे शास्त्रज्ञ डॉ. अंकुश कांबळे यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, तर डॉ. सौरव कुमार यांनी मत्स्यसंपदा योजनेबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी