वॉशिंगटन , 9 जून (हिं.स.)।अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अशांतता पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, एका परदेशी महिला पत्रकारावर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांकडून गोळीबार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना ट्रम्प प्रशासनाच्या अलीकडील हद्दपारी मोहिमेनंतर उसळलेल्या निदर्शनांच्या दरम्यान घडली.
व्हायरलं व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ऑस्ट्रेलियन महिला पत्रकार लॉरेन टोमासी या घटनास्थळावरून थेट लाईव्ह रिपोर्टिंग करताना मागे उभ्या असलेल्या दंगलविरोधी पोलिस पथकातील एका अधिकाऱ्यानं त्यांच्या पायावर गोळी झाडलीये. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये रबर बुलेट वापरण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय. टोमासी यांनी आरोप केलाय की, त्या शांततेत रिपोर्टिंग करत असताना पोलिस अधिकाऱ्यानं त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केलं. गोळीबाराचा क्षण कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, गोळी लागल्यानंतर त्या वेदनेने ओरडताना दिसत आहेत. त्यांचा आवाजही ऐकू येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा लॉस एंजेलिस पोलिस दंगल नियंत्रित करण्यासाठी पुढे सरकले, तेव्हा त्यांनी गर्दीवर रबर बुलेटचा वापर सुरू केला. याच वेळी टोमासी यांना पायावर गोळी लागली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येतंय की, तुम्ही रिपोर्टरला गोळी मारलीये!. त्या वेदनेने ओरडताना दिसत आहेत.या घटनेत लॉरेन टोमासी यांना दुखापत झाली असली, तरी गंभीर इजा टळली आहे. तथापि, या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान,लॉस एंजेलिसमध्ये फेडरल इमिग्रेशनच्या छाप्यानंतर काही नागरिकांना अटक करण्यात आली होती. या कारवाईला विरोध करण्यासाठी निदर्शने सुरू झाली आणि नंतर हिंसक वळण मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode