अकोला, 1 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) अधिकाऱ्याला भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ व खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने त्यांना दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन कायम ठेवण्यात आला आहे.
सदर प्रकरणात मजीप्राच्या अकोट येथील अधिकारी संजय आठवले यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणात दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आणि खंडणी मागितल्याचा आरोप आहे. यावरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. अकोट येथील सत्र न्यायालयात २१ एप्रिल रोजी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.यानंतर गोपाल दातकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. १३ मे रोजी न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत हा जामीन कायम ठेवण्यात आला.
कोर्टाने जामीनाच्या अटी घालून, दातकर यांना दर मंगळवारी संबंधित पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याची अटही घालण्यात आली आहे. अर्जदाराच्या वतीने ॲड. आनंद राजन देशपांडे व ॲड. श्रीराम धैर्यवर्धन पुंडकर यांनी बाजू मांडली.
--------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे