जळगाव, 1 जुलै (हिं.स.) भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये अवैध फेरीवाल्यांचा त्रास वाढला आहे. त्यातच चोरटे देखील सक्रिय आहेत. अशातच रेल्वे स्थानकावर आरपीएफ, जीआरपीतर्फे केलेल्या कारवाईत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोबाईल चोरीची कबुली मिळाल्याने त्यांना लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले आहे. प्लॅटफॉर्म ६ वर आरपीएफ जवान जे.बी. नेरपगार, महेंद्र कुशवाह, कपिल सांगवान, अनुज कुमार व बाबू मिर्झा हे गस्त घालत असताना एक संशयीत फिरताना आढळला. त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव नितीन संजय धनके (वय २६, रा. मुक्ताईनगर) असे सांगितले. त्याच्या पँटच्या खिशातून २० हजाराचा मोबाईल मिळाला. सदर मोबाईल भुसावळ स्थानकावर झांसी एक्स्प्रेस (०१९२१) च्या स्लीपर कोचमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर