राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिकांना 19 जुलैपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रण, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियान जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आह
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार


नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.)

: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रण, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियान जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे आणि वृत्तकथांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत आता 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या पुरस्कार स्पर्धेसाठी अर्जाचे नमुने आणि माहितीपत्रक शासनाच्या महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. राज्यातील स्पर्धकांनी आपल्या संबंधित जिल्हा माहिती कार्यालयामार्फत, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करावेत.

दिल्लीतील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात सादर कराव्यात.

राज्य शासनामार्फत एकूण 20 पुरस्कार प्रदान केले जातील, यामध्ये 1 राष्ट्रीय स्तरावरील, 11 राज्य स्तरावरील आणि 8 विभागीय स्तरावरील पुरस्कारांचा समावेश आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या उत्कृष्ट साहित्याच्या प्रवेशिका निर्धारित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक(मा.) मनिषा पिंगळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande