डोंबिवली स्थानकात प्रवाशांची अफाट गर्दी; प्रवाशांची जबाबदारी सरकारची - राजू पाटील
डोंबिवली, 30 जुलै, (हिं.स.)। मध्ये रेल्वे स्थानकात सर्वात जास्त गर्दीचे स्थानक हे डोंबिवली रेल्वे स्थानक आहे. दररोज मुंबईला कामाला जाणाऱ्या डोंबिवलीकरांचा प्रवास म्हणजे आपला जीव धोक्यात घालून केलेला प्रवास असतो. ठाकुर्ली ते डोंबिवली, डोंबिवली ते कोपर
डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची अफाट गर्दी, प्रवाशांची जबाबदारी सरकारची


डोंबिवली, 30 जुलै, (हिं.स.)। मध्ये रेल्वे स्थानकात सर्वात जास्त गर्दीचे स्थानक हे डोंबिवली रेल्वे स्थानक आहे. दररोज मुंबईला कामाला जाणाऱ्या डोंबिवलीकरांचा प्रवास म्हणजे आपला जीव धोक्यात घालून केलेला प्रवास असतो. ठाकुर्ली ते डोंबिवली, डोंबिवली ते कोपर, कोपर ते दिवा आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून अनेक प्रवासी मृत्यूमुखी पडले. डोंबिवली रेल्वे स्थानकातील हे चित्र कधी बदलणार? प्रवाशांची जबाबदारी सरकारची आहे अशी पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रमोद ( राजू ) पाटील यांनी एक्स पोस्टद्वारे केली आहे.

यामध्ये मनसे नेते पाटील यांनी एक्स पोस्ट मध्ये लिहिले आहे की, आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र ! हे रोजचेच आहे. राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार फार एखादी दुर्घटना झाली की ५ लाखाचा चेक घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहीत तयारही असतात, पण कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत. निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी पटापट होणारे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा मुंबई लोकलचे महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वेबोर्ड स्थापन करून लोकलसेवा कशी सुधारता येईल यासाठी एक योजना हाती घेणे आवश्यक आहे.उत्तरेकडून येणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या काही बिनकामाच्या मेल-एक्सप्रेस मुंबई बाहेरून सोडल्यास लोकलच्या अधिक फेऱ्या वाढवता येतील.वंदे भारतला दिलेली प्राथमिकता या गोंधळात अधिक भर टाकत आहे अश्याही तक्रारी प्रवासी करत आहेत.

या लोकलने प्रवास करणारे चाकरमनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. आपण ज्या मुंबईच्या जीवावर देशभरात नंबर एकची जी टीमकी वाजवतो त्या मुंबईला संपन्न करण्यासाठी आपले जीव रोजच धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही राज्य सरकारची पण आहे. सरकारने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करावा. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे तिकडे जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पण याबाबत आवाज उठवावा.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande