सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ डिसेंबर १९३७ रोजी पंढरपूरला जाण्यासाठी कुर्डुवाडी स्थानकावर आले होते. त्यांच्या स्वागत समारंभाच्या छायाचित्राची फ्रेम रेल्वे विभागाने तयार केली असून कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य कार्यालयात ती आता झळकणार आहे. जिल्ह्यातील इतर अशाच छायाचित्रांचा शोध रेल्वे विभाग घेत आहे.
रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी कुर्डुवाडी स्थानकातील स्टेशन मास्तरच्या दालनात लावण्यासाठी १९३७ मधील छायाचित्रापासून फ्रेम तयार केली आहे. ३१ डिसेंबर १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पंढरपूर येथे जाण्यासाठी कुर्डुवाडी स्थानकावर आले होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. या प्रसंगाचे हे छायाचित्र आहे. लवकरच ही फ्रेम कुर्डुवाडी स्थानकावर झळकणार आहे. अशाच आणखी काही पाऊलखुणांचा शोध घेऊन रेल्वे प्रशासन अशी छायाचित्रे विविध ठिकाणाच्या कार्यालयात लावण्यासाठी तयार करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड