अहिल्यानगर दि. 14 जुलै (हिं.स.) :- नगर जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (13 जुलै) शांततेत पार पडली. 22 वर्षाच्या सत्ताबदलनंतर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे सत्ताधारी संचालक मंडळाच्या या पहिल्याच वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते.
बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन मध्ये सोसायटी चे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सुनील दानवे आदींसह सोसायटीचे माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, काटकसरीने संस्थेचा कारभार सुरू असून, संस्थेचा विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन संचालक मंडळ कारभार करणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षात 7 टक्के या अल्प दराने 995 कोटीचे कर्ज वाटप केले असून, सर्व आवश्यक त्या तरतुदी करून 9 कोटी 89 लाखाचा नफा मिळवला आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेचा कॅश क्रेडिटचा व्याजदर वाढलेला असून देखील मागील आर्थिक वर्षापेक्षा यावर्षी बँक कॅश क्रेडिटची उचलही वाढल्या कारणाने कॅश क्रेडिटचे व्याज हे रुपये 3 कोटी 25 लाख इतके कॅश क्रेडिट पोटी जास्तीचे गेलेले असल्याचे स्पष्ट करुन लाभांशात वाढ दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले.ठेवीमध्ये वाढ करण्यासाठी ठेवी वाढवा अभियान सुरू केले जाणार आहे.सोसायटीचे कारभात हातात घेतल्यापासून काटकसरीने काम सुरु करण्यात आले असून, मागील वर्षीच्या वार्षिक सभेत हॉलच्या निम्म्या रकमेत हॉल भाड्याने घेतले. तर अहवाल छपाईसाठी देखील दीड लाखा पर्यंत खर्च वाचविण्यात आला असल्याचे सांगितले. तर सर्व सभासदांनी विश्वास टाकून बहुमताने सोसायटीची सत्ता ताब्यात दिल्याबद्दल व्यासपिठावर ते नतमस्तक झाले होते.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni