रत्नागिरी, 14 जुलै, (हिं. स.) : पाचाड (ता. चिपळूण) येथील चिलेवाडीतील ग्रामस्थांनी आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत श्रमदानातून सात बंधारे बांधले. तसेच गावातील पडीक जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही केली. रस्त्यांवरील झाडाझुडपांची स्वच्छताही करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण जपण्याबरोबरच पाण्याचा साठा आणि शाश्वत शेतीला हातभार लागणार आहे.
या कामांची माहिती मिळताच चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम, क्रांतीकचे सचिव जयेंद्रथ खताते, विकास गमरे, पंचायत समितीचे अधिकारी श्री. दाभोळकर यांनी पाचाडच्या चिलेवाडीला भेट दिली. त्यांनी कामाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ व मुंबई मंडळातील चाकरमान्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी शौकतभाई मुकादम म्हणाले, वृक्षलागवड, संवर्धन आणि जलसंधारण अत्यावश्यक आहे. अशा प्रकारचे उपक्रम गावोगावी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी