सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। मराठी माध्यमाच्या विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामागे गुणवत्तेतील घसरण, गावातील पुढाऱ्यांची स्पर्धक शाळा, पटसंख्या वाढीतील शिक्षकांची अनास्था अशी कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या खूपच कमी झाली, त्या शाळांना अधिकारी भेटी देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळणार आहेत. त्यावेळी पटसंख्या वाढीसाठी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७३ शाळा असून त्यातील ३०० पेक्षा जास्त शाळांची पटसंख्या गतवर्षी २० पेक्षा कमी होती. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या किती शाळांची पटसंख्या कमी झाली, किती शाळांचा पट वाढला आणि किती शाळांची पटसंख्या मागच्या वर्षी एवढीच राहिली, याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविली आहे.
दरम्यान, पटसंख्या कमी होण्यास शिक्षकांनाच जबाबदार धरता येणार नाही, तशी कायद्यात तरतूद देखील नाही.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड