सोलापूर शहरात नाकाबंदी व गस्तीत वाढ
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। सार्वजनिक रस्त्यांवरील टवाळखोरी, किरकोळ भांडण, वादावादी, छेडछाड आणि दोन गटातील हाणामारी अशा घटना वाढल्याने सोलापूर शहरात आता नाकाबंदी व गस्त वाढविण्यात आली आहे. दररोज शहरातील सहा ठिकाणी किमान तीन तास अचानक नाकाबंदी आणि र
सोलापूर शहरात नाकाबंदी व गस्तीत वाढ


सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)।

सार्वजनिक रस्त्यांवरील टवाळखोरी, किरकोळ भांडण, वादावादी, छेडछाड आणि दोन गटातील हाणामारी अशा घटना वाढल्याने सोलापूर शहरात आता नाकाबंदी व गस्त वाढविण्यात आली आहे.

दररोज शहरातील सहा ठिकाणी किमान तीन तास अचानक नाकाबंदी आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पोलिसांची गस्त राहणार आहे. रात्री आठ वाजता पोलिस अंमलदारांच्या ड्यूटी बदलतात आणि त्यामुळे रस्त्यांवर पोलिस दिसत नाहीत.

सोलापूर शहरात रात्री आठ ते दहा या वेळेतच अनेकदा दोन गटातील हाणामारी, वादावादी, भांडणे झाल्याचे अलीकडे पाहायला मिळाले. विविध भागात २५ पेक्षा जास्त पोलिस चौक्या आहेत, पण त्यात पोलिस दिसत नाहीत. ड्यूटी बदलत असल्याने सगळेजण पोलिस ठाण्यात हजेरीसाठी जातात आणि ड्यूटी संपलेले घराच्या दिशेने निघतात. त्यावेळी गुन्ह्यांची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे आता रात्री ८ ते १० या वेळेत नियमितपणे प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागात तथा गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालतील.

त्यावेळी त्यांच्यासोबत अन्य पोलिस अंमलदार देखील असणार आहेत. पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तही तेथे भेटी देऊन पाहणी करतील. त्यातून गुन्हे घडणार नाहीत, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande