सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। संत मुक्ताबाई यांनी स्त्रीशक्तीला आत्मबळ दिले. भेदभाव विरोधात आवाज दिला. भक्तीला आत्मज्ञानाशी जोडले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांनी केले.
येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात स्व. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव कांळुगे यांचे स्मरणार्थ धनश्री, सिताराम परिवाराकडून आयोजित पाच दिवसीय धनश्री प्रवचनमालेत ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या मुक्ताबाईच्या अभंगाचे विवेचन ह.भ.प.अॅड. जयवंत बोधले यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
बोधले महाराज म्हणाले की, विनंती आणि उपदेश या दोन विरोधाभास वाटणार्या गोष्टी मुक्ताईच्या अभंगात एकरूप होतात. ज्या भाषेत नम्रता आहे, त्या भाषेतूनही उपदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे ही विनंती असूनही त्यामागे गूढ उपदेश लपलेला आहे. संत हा असा ज्ञानयोगी असतो की, तो आत्मज्ञानाने ब्रह्मात एकरूप होतो. पण लोकांशी संवाद करताना भक्ती, प्रेम, उपदेश यासाठी सगुण मार्गाने येतो.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड