अमरावती, 2 जुलै (हिं.स.) : गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील सितारा कॉलनी ले-आउट येथे घरगुती भारत गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस रिफिलिंग करणाऱ्या अवैध धंद्यावर गुन्हे शाखा युनिट क्र. 01 आणि गाडगेनगर पोलीसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून, २२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 1 जुलै रोजी छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी शहजाद परवेज अब्दुल जहीर (वय 37, रा. सुफीयान नगर, वलगाव रोड) हा इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने घरगुती सिलेंडरमधून गॅस रिफिल करताना आढळून आला. घटनास्थळावरून 3 भरलेले, 8 रिकामे व 1 अर्धवट भरलेला सिलेंडर, एक इलेक्ट्रिक मोटर, प्रो युनायटेड कंपनीचा वजन काटा असा एकूण 22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपआयुक्त कल्पना बारवकर, पोलीस उपआयुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोनि. गोरखनाथ जाधव व गुन्हे शाखा युनिट क्र. 01 च्या पथकाने केली. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी