नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. आगामी 9 जुलै पर्यंत चालणारा हा 8 दिवसांचा दौरा गेल्या 10 वर्षातील त्यांचा सर्वात मोठा राजनैतिक दौरा असेल. यादरम्यान ते घाना, त्रिनिदाद-टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाला भेट देतील. तसेच ब्राझीलमध्ये ते ६-७ जुलै रोजी १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील.
पंतप्रधान मोदींचा दौरा घाना येथून सुरू होईल. पंतप्रधान २ ते ३ जुलै दरम्यान येथे राहतील. गेल्या 3 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच घाना दौरा आहे. यादरम्यान ते घानाच्या राष्ट्रपतींना भेटतील आणि आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्याला नवीन उंची देण्याबाबत चर्चा करतील. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याची ही सुवर्णसंधी असेल. यानंतर, पंतप्रधान मोदी ३-४ जुलै रोजी त्रिनिदाद-टोबॅगोला पोहोचतील. या भेटीमुळे भारत आणि या कॅरिबियन देशामधील व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना नवी ताकद मिळेल.
या दौऱ्याचा तिसरा टप्पा अर्जेंटिना येथे असेल. पंतप्रधान मोदी ४-५ जुलै रोजी मुक्काम करतील. तेथे ते संरक्षण, शेती, खाणकाम, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रात भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देतील. या भेटीमुळे भारत आणि अर्जेंटिनामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांना एक नवीन आयाम मिळेल. त्यानंतर, पंतप्रधान ५-८ जुलै दरम्यान ब्राझीलला भेट देतील. रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांची भेट घेतील.
शिखर परिषदेनंतर, अध्यक्ष सिल्वा पंतप्रधान मोदींसाठी खास डिनरचे आयोजन होणार आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत, पंतप्रधान मोदी जागतिक प्रशासनातील सुधारणा, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीय संस्था मजबूत करणे, एआयचा जबाबदार वापर, हवामान बदलाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक पावले आणि जागतिक आरोग्य यावर चर्चा करतील. शिखर परिषदेव्यतिरिक्त, ते अनेक देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील. ब्राझीलच्या भेटीदरम्यान, ते व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, शेती आणि आरोग्य या क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या पावलांवर राष्ट्रपती लुला यांच्याशी चर्चा करतील. ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा शेवटचा मुक्काम नामिबिया असेल. पंतप्रधान ९ जुलै रोजी येथे पोहोचतील. ते तेथील संसदेत भाषण देण्याची अपेक्षा आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याला नवी चालना मिळेल.
नामिबियाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे तिसरे भारतीय पंतप्रधान असतील. यापूर्वी २००० मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार फक्त ३ दशलक्ष डॉलर्सचा होता, जो आता सुमारे ६०० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला आहे. भारतीय कंपन्यांनी नामिबियाच्या खाणकाम, उत्पादन, हिरे प्रक्रिया आणि सेवा क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode