तब्बल 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचे प्रकरण
नवी दिल्ली, 03 जुलै (हिं.स.) : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अंमलबाजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. हायकोर्टाने आज, गुरुवारी जॅकलिन फर्नांडिसची याचिका फेटाळून लावली.
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंगची तक्रार रद्द करण्याची तिची विनंती करणारी जॅकलिनची याचिका फेटाळलीय. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तिच्या आव्हानात तथ्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन विरोधात दाखल झालेले एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. जॅकलीनची ही विनंती याचिका न्या. अनीश दयाल यांनी फेटाळून लावली. न्यायालयाने नमूद केले की, विशेष न्यायालयाने आधीच आरोपपत्राची दखल घेतली आहे. याचिका दाखल करताना, जॅकलीनने तिच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. सुकेश चंद्रशेखरसोबतच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या चर्चेलाही नकार दिला होता. सुकेश चंद्रशेखर आणि आदिती सिंगने आपली फसवणूक केली असून मनी लाँड्रिंग प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नव्हती असे जॅकलिनने म्हंटले आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी