बीजिंग, 2 जुलै (हिं.स.)
चीनचे
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित
राहणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान
ली चियांग ब्रिक्स शिखर परिषदेत अध्यक्ष जिनपिंग यांच्या जागी चीनचे प्रतिनिधित्व
करणार आहेत.
माओ निंग यांनी जिनपिंग यांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा
निर्णय का, घेतला हे सांगितले नाही. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे
परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले होते की, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई
लावरोव्ह ब्राझीलमध्ये रशियाचे प्रतिनिधित्व करतील. राष्ट्राध्यक्ष पुतिन व्हिडिओ
लिंकद्वारे शिखर परिषदेत सहभागी होणार
आहेत.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी ६ आणि ७ जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स
देशांच्या वार्षिक शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. गेल्या वर्षी
रशियातील काझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी
जिनपिंग यांची भेट झाली होती. याबैठकीनंतर दोन्ही देशांनी विविध द्विपक्षीय संवाद यंत्रणा पुनर्संचयित करण्यास
सहमती दर्शविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील चर्चेनंतर
द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या उद्देशाने
गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांकडून अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra