नवी दिल्ली, 29 जुलै (हिं.स.) : ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान संयुक्त राष्ट्रातील 193 पैकी 190 देशांनी समर्थन दिले. परंतु, भारतीय जवानांच्या शौर्य आणि पराक्रमाला काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकला नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूर संदर्भातील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आमच्या मेड इन इंडिया क्षेपणास्त्रे आणि तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली. आमच्या तिन्ही सैन्यांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर भारत घरात घुसून त्यांना मारेल. आता दहशतवाद्यांचे मालक हल्ल्यानंतर झोपू शकत नाहीत. जर भारतावर हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊ. आता अणवस्त्रांच्या नावाखाली कोणतेही ब्लॅकमेलिंग चालणार नाही. आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या संरक्षक सरकारला वेगळे पाहणार नाही असे पंतप्रधानांनी सांगितले.
या चर्चेदर्मयान सभागृहात परराष्ट्र धोरण आणि पाठिंब्याबद्दल येथे बरेच काही बोलले गेले. जगातील कोणत्याही देशाने भारताला त्याच्या सुरक्षेत कारवाई करण्यापासून रोखले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या 193 पैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानच्या समर्थनात निवेदन दिले होते. क्वाड असो, ब्रिक्स असो, कोणताही देश असो, भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला. मी परराष्ट्र धोरणाबद्दल स्पष्टपणे बोलत आहे, आम्हाला जगाचा पाठिंबा मिळाला, परंतु दुर्दैवाने माझ्या देशातील वीरांच्या शौर्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही अशी घणाघाती टीका पंतप्रधानांनी केली. भारतात हिंदू-मुस्लीम दंगल घडवणे हा पहलगाम हल्ल्याच्या मागचा हेतू होता. निष्पाप नागरिकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. देशवासीयांनी हा कट उधळून लावला. मी 22 एप्रिल रोजी परदेशात होतो. मी परत आलो तेव्हा मी एक बैठक बोलावली आणि दहशतवाद्यांच्या मालकांना योग्य उत्तर देण्यास सांगितले. मी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना कल्पनेपलीकडे शिक्षा करण्याचा, दहशतवाद्यांना संपवण्याचा माझा निर्धार व्यक्त केला. आम्हाला सैन्याच्या क्षमतेवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. आम्ही सैन्याला पूर्ण अधिकार दिला. दहशतवाद्यांच्या मालकांनाही अंदाज होता की भारत कारवाई करेल. तिथूनही अणवस्त्र हल्ल्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. आम्हाला अभिमान आहे की 6 आणि 7 मे च्या रात्री आम्ही दहशतवाद्यांना आम्ही ठरवल्यानुसार उत्तर दिले. आम्ही हल्ला केला आणि पाकिस्तान काहीही करू शकला नाही. आम्ही असे चोख प्रत्युत्तर दिले की आजही दहशतवादाचे सूत्रधार घाबरलेले आहे.भारताने 22 एप्रिलचा बदला 22 मिनिटांत घेतला. आम्ही ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही गेलो नव्हतो तिथे घुसूनही हल्ला केला. आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आम्ही पाकिस्तानच्या अणुहल्ल्यांच्या धमक्या निराधार असल्याचे सिद्ध केले. भारताने दाखवून दिले की आम्ही या धमक्यांपुढे झुकणार नाही. आम्ही पाकिस्तानच्या छाताडात असे घाव केले आहेत की, आजही त्याची अनेक विमानतळं आयसीयूमध्ये असल्याचे मोदींनी सांगितले.
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमची जगभरात चर्चा आहे. आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या हल्ल्यांना परतवून लावले. पाकिस्तानने 9 मे रोजी भारतावर 1000 क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सनी हल्ला केला होता. भारताच्या हवाई दलाने हे सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
भारताने कोणत्याही जागतिक नेत्याच्या सांगण्यावरून शस्त्रसंधी केलेली नाही. गेल्या 9 मे रोजी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मी काही वेळाने त्यांच्याशी बोललो. उपराष्ट्रपतींनी मला सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना ठणकावून सांगितले की, पाकिस्तानने असा काही प्रयत्न केला तर त्यांना महागात पडेल. आम्ही मोठा हल्ला करून त्यांना उत्तर देऊ, असे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना बजावल्याचे मोदींनी लोकसभेत सांगितले. यासोबतच ऑपरेशन सिंदूर अजून संपले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी