अकोला, 3 जुलै, (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात दि. 7 जुलै रोजी दुपारी 12.30 वा. येथे होणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती,व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूती योजना राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात महाविद्यालयांच्या महाडीबीटी पोर्टलवरील सद्य:स्थितीचे अवलोकन केले असता 2024-25 या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाचे 15 हजार 228 अर्ज आतापर्यंत भरण्यात आले आहेत. मात्र, महाविद्यालय स्तरावर अद्यापही 1 हजार 88 अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्याच्या अनुषंगाने आणि नव्या शैक्षणिक वर्षातील कार्यवाहीबाबत मार्गदर्शनासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सहाय्यक समाजकल्याण आयुक्त डॉ. एम.जी. वाठ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे