लंडन, 3 जुलै (हिं.स.)
स्पेनच्या द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझने
विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. त्याने ब्रिटीश टेनिसपटू
ऑलिव्हर टार्वेटचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला.
फ्रेंच ओपन विजेत्या कार्लोस अल्कारेझला विम्बल्डनचा
आपला दुसऱ्या फेरीचा सामना जिंकण्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत. त्याने
ऑलिव्हरवर ६-१,६-४,६-४ ने मात करत तिसऱ्या फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. आता पुढच्या
फेरीत त्याचा मुकाबला कॅनडाचा २५ वा मानांकित टेनिसपटू फेलिक्स अथवा जर्मनीच्या
जेन-लेनार्ड स्टर्फ या दोघांच्या विजेत्या टेनिसपटूशी होणार आहे.
महिला एकेरीच्या सामन्यात अव्वल सीडेड
बेलारुसच्या अर्याना सबालेन्काने विम्बल्डनची तिसरी फेरी गाठली आहे. तिने बिगरमानांकित
मेरी बोऊझकोव्हावर ७-६, ६-४ ने पराभव केला. या हंगमात विम्बल्डनमध्ये अनेक
मानांकित टेनिसपटूंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मात्र, अल्कारेझ आणि
सबालेन्काने विम्बल्डनमधील आपले आव्हान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra