नाशिक, 3 जुलै (हिं.स.)।
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा जणांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन - (एमसीए) - वर विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे.
नाशिकचे माजी रणजीपटू सलिल आघारकर यांची यंदा देखील महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य म्हणून नेमणूक कायम राहिली आहे. त्याबरोबरच दूसरा रणजीपटू अमित पाटील यंदा देखील महाराष्ट्र रणजी संघाबरोबर राहणार असून त्यास क्षेत्ररक्षक प्रशिक्षक या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भगवान काकड हे २३ वर्षांखालील संघाच्या निवड समितिवर नियुक्त झाले आहेत.
महिला क्रिकेटमध्ये देखील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उत्तम कामगिरीची दखल घेतली असून जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला निवड समितिच्या शर्मिला साळी या वरिष्ठ व २३ वर्षांखालील महिला संघाच्या निवड समितिवर नियुक्त झाल्या आहेत.
विनोद यादव यंदा देखील २३ वर्षांखालील संघाचे स्ट्रेंग्थ आणि कंडीशनींग कोच असतील. तर, घनश्याम देशमुख १४ वर्षांखालील मुलांच्या संघाच्या निवड समितिवर नियुक्त झाले आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे या नेमणुका पुणे येथे जाहीर करण्यात आल्या.
नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडींमुळे, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI