रोहा, 3 जुलै (हिं.स.)। रोहा तहसिलदार कार्यालया मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान रोहा शहरातील जेष्ठ नागरीक सभागृह येथे दि.5 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपन्न होणार आहे. या शिबीरास नागरीक,शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे व विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहा तहसीलदार डॉ.किशोर देशमुख यांनी केले आहे.
या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवड हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते विविध विभागातील सेवाबाबत मंजुरी पत्र दाखले, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेचे काही प्रश्न असल्यास त्याबाबत देखील समाधान होण्याबाबत आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तालुक्यातील सर्व विभागाचा सहभाग राहणार असून विविध विभागाच्या नवीन योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या शिबीरा दरम्यान विविध योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सद्य: परिस्थितीत नागरिकांना व विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले या शिबीरात देण्यात येणार आहेत.
शिबीरात रोहा तालुक्यातील अनुक्रमे पंचायत समिती रोहा, तालुका कृषी, तालुका आरोग्य, उपअभियंता, म.रा.वि.मं. रोहा, उप अधिक्षक भूमि अभिलेख रोहा, संजय गांधी निराधार, पुरवठा, निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन विभाग कडील विविध उपक्रमे व त्याची माहिती बाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant