जिल्ह्यात आर्थिक समावेशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी - रायगड जिल्हाधिकारी
अलिबाग, 3 जुलै (हिं.स.)। 1 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीत शिबिरांचे आयोजन भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात आर्थिक समावेशन योजनेच्या शिबीरांना सुरुवात झाली आहे. तळागाळातील नाग
आर्थिक समावेशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी


अलिबाग, 3 जुलै (हिं.स.)। 1 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीत शिबिरांचे आयोजन भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात आर्थिक समावेशन योजनेच्या शिबीरांना सुरुवात झाली आहे. तळागाळातील नागरिकांपर्यंत विविध केंद्र व राज्य शासनाच्या वित्तीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. या उपक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, लीड बँक मॅनेजर विजय कुलकर्णी, जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शिनी मोरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या, जिल्हा प्रकल्प अधिकारी तेजस्वीनी गलांडे आणि विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, या शिबीरांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या शिबिरांद्वारे लाभार्थ्यांची बँक खाती उघडणे, योजना अंतर्गत नोंदणी करणे तसेच आधीच बँक खाती असलेल्या लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’ करणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी बँक खात्यांची ‘ई-केवायसी’ करणे आवश्यक असते. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायती स्तरावर व्यापक जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला पाहिजे असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. तसेच ज्या बँकांना शिबिरांचे लक्ष देण्यात आले आहे त्यांनी ते पूर्ण करावे, त्यासाठी ग्रामपंचायत ,ग्रामसेवक, तलाठी यांचे सहकार्य घ्यावे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अग्रणी बँक यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant


 rajesh pande